इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरायची तारीख जवळ येते, तशी महत्वाची कागदपत्रं जमा करायची धावपळ वाढून जाते. आत्ताही तारीख जवळ आली असून आयटीआर 31 जुलैपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक जण अखेरच्या महिन्यात भरण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे घाई गडबडीत भरताना चुका होण्याच्या शक्यता अधिक वाढतात. यामध्ये रिटर्नमध्ये चुकीचं उत्पन्न टाकणं, एखादं इन्कम टाकायचं विसरणं अशा काही चुका होतात. या चुकांमुळे पुढे अडचणी निर्माण करू शकतात.
आयटीआर भरायच्या आधी करदात्यांना आपल्या इन्कमचं अचूक तपशील देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी Form 16, AIS यांसारख्या कागदपत्रांचा आधार तुम्ही घेऊ शकता. पगाराव्यतिरिक्त शेअर्स, मालमत्ता विक्रीतून झालेला नफा किंवा बँकेतील ठेवींवर मिळालेलं व्याज यांची माहितीही रिटर्नमध्ये नमूद करणे आवश्यक असते. जर तुम्ही दाखवलेलं उत्पन्न आणि अधिकृत कागदपत्रांमधील माहिती यात फरक आढळला, तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.
अनेक करदाते टॅक्स वाचवण्यासाठी विविध डिडक्शन्स किंवा करसवलतींचा लाभ घेतात. इन्कम टॅक्सच्या जुन्या रिजिममध्ये अशा अनेक सवलती उपलब्ध आहेत, ज्यामुळे टॅक्सचा भार कमी होतो. मात्र, पात्र नसतानाही चुकीच्या सवलतींचा दावा केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या सवलतीसाठी आपण खरोखर पात्र आहोत, त्याचाच दावा करावा. तसेच, त्या संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे जवळ ठेवणेही महत्त्वाचे आहे.
HRA (House Rent Allowance) मुळे कराचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे अनेक कर्मचारी या सवलतीचा लाभ घेतात. मात्र, HRA क्लेम करताना आयकर विभागाने ठरवून दिलेले काही नियम पाळणे आवश्यक असते. यासाठी घरमालकाचा PAN, पत्ता आणि भाडे भरल्याच्या पावत्या देणे गरजेचे असते. जर कोणी खोटी कागदपत्रे दाखवून HRA सवलतीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.
टीडीएस म्हणजेच Tax Deducted at Source अर्थात उत्पन्नातून आधीच कापला जाणारा टॅक्स. या रकमेत तफावत आढळल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येऊ शकते. अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापला जातो; मात्र संबंधित कंपनी तो वेळेवर सरकारकडे जमा करत नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या नोंदी आणि तुमच्या फॉर्म 16 मधील माहितीत फरक दिसू शकतो. अशा परिस्थितीत नोटीस येण्याची शक्यता असते. म्हणूनच फॉर्म 16 मध्ये दाखवलेली टीडीएसची रक्कम काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे. काही चूक आढळल्यास संबंधित कंपनीशी संपर्क साधून ती दुरुस्त करून घ्यावी. फॉर्म 16 मध्ये टीडीएस जमा केल्याची संपूर्ण माहिती दिलेली असते.
जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात मोठे व्यवहार केले असतील, तर त्याची माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये देणं आवश्यक असतं. उदा. एका आर्थिक वर्षात बँकेत 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात जमा केली असेल. तसेच, क्रेडिट कार्डद्वारे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली असेल किंवा म्युच्युअल फंडामध्ये 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल, तरी त्याची नोंद रिटर्नमध्ये करणं आवश्यक असतं. अशा व्यवहारांची माहिती न दिल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता असते.
आता कोणत्या कारणांनी नोटीस येऊ शकते, हे आपल्याला माहिती झालं आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स भरताना, आपण चुकीची माहिती देत नाही आहोत, याची खात्री करा. तसेच, आवश्यक कागपत्रेही सोबत ठेवा.. त्यामुळे अचूक इन्कम टॅक्स तुम्हाला भरता येणार..