इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकजण आवश्यक कागदपत्रं गोळा करण्यात व्यस्त आहेत. मात्र, घाईगडबडीत किंवा अपुरी माहिती असल्यामुळे अनेकांकडून चुकीचा ITR भरला जातो. यामुळे नंतर इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, रिफंड उशिरा मिळणं किंवा इतर अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच 2026-27 साठी ITR भरत असाल, तर आधी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवणं महत्त्वाचं आहे. योग्य कागदपत्रं आधीपासून तयार असतील, तर ITR भरणं सोपं होतं आणि चुका होण्याची शक्यताही कमी होते. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, फ्रीलान्सर असाल, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा पेन्शन घेत असाल, तरी काही महत्त्वाची कागदपत्रं जवळ असणं आवश्यक आहे.
इन्कम टॅक्स विभागानुसार ITR भरण्यासाठी सर्वांत गरजेचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. तसेच, पॅन आणि आधार लिंक असणंही गरजेचं आहे. दोन्ही लिंक नसतील, तर रिटर्न भरताना अडचणी येऊ शकतात. नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ही माहिती दोन्हीकडे एकसारखी असावी.
पगारदार कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीकडून फाॅर्म 16 घ्यावा. यात संपूर्ण वर्षातील पगार आणि TDS (Tax Deducted at Source) ची माहिती दिलेली असते. फाॅर्म 16 च्या पार्ट-A मध्ये कर्मचारी आणि कंपनीची माहिती असते, तर पार्ट-B मध्ये पगाराचं तपशीलवार ब्रेकअप, सूट आणि कपातीची माहिती दिलेली असते. वर्षभरात नोकरी बदलली असेल, तर प्रत्येक कंपनीकडून फाॅर्म 16 घेणं आवश्यक आहे.
दर महिन्याला मिळणाऱ्या सॅलरी स्लीप्स जपून ठेवा. यात सॅलरी, PF ची रक्कम, बोनस, अलाउन्स आणि इतर रकमेची माहिती मिळते. त्यामुळे आधीच सॅलरी स्लीप जवळ घेऊन ठेवाव्यात..
ITR भरण्यापूर्वी फाॅर्म 26AS आणि AIS (Annual Information Statement) नीट तपासा. यामध्ये TDS, व्याजातून मिळालेलं उत्पन्न, डिव्हिडंड, शेअर्स आणि म्युच्युअल फंड व्यवहारांची माहिती असते. तुमच्या उत्पन्नाची माहिती आणि AIS मधील माहिती जुळली नाही, तर इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी किंवा नोटीस येऊ शकते.
तुमच्या सर्व सुरू असलेल्या बँक खात्यांचे स्टेटमेंट जवळ ठेवा. यामधून सेव्हिंग अकाउंटवरील व्याज, फिक्स डिपॉझिटवरील व्याज, भाड्यावरील उत्पन्न आणि इतर व्यवहारांची माहिती मिळते. बँक किंवा पोस्ट ऑफिसकडून दिलं जाणारं इंटरेस्ट सर्टिफिकेटही महत्त्वाचं असतं. यामुळे टॅक्सेबल व्याजाचं उत्पन्न अचूक दिसून येते.
जर तुम्ही शेअर्स, ETFs, म्युच्युअल फंड किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली असेल, तर कॅपिटल गेन स्टेटमेंट जवळ ठेवा. यामुळे शाॅर्ट टर्म आणि लाॅन्ग टर्म नफा योग्य पद्धतीने मोजता येतो. इंट्राडे ट्रेडिंग किंवा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करणाऱ्यांनी प्राॅफिट व लाॅस स्टेटमेंटत यार ठेवणं आवश्यक आहे.
होम लोनवरील कर सवलतीसाठी बँकेकडून इंटरेस्ट सर्टिफिकेट घ्यावं लागतं. यामुळे सेक्शन 24(b) आणि सेक्शन 80C अंतर्गत कपात क्लेम केली जाऊ शकते..
PPF, ELSS, NPS, सुकन्या योजना, Tax Saving FD किंवा जीवन विम्यामध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याची कागदपत्रं तयार ठेवा. मुलांच्या ट्युशन फीचे पुरावेही उपयोगी पडतात.
सेक्शन 80D अंतर्गत डिडक्शनसाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची पावती आवश्यक असते. HRA सवलतीसाठी भाड्याच्या पावत्या, रेंट अॅग्रीमेंट आणि काही वेळा घरमालकाचा PAN नंबरही द्यावा लागू शकतो.
ITR भरताना कोणत्या आवश्यक गोष्टी लागणार आहेत. याची आता तुम्हाला पूर्ण माहिती झाली असेल, अशी अपेक्षा आहे.. त्यामुळे आयटीआर भरायचा असल्यास लगेच भरून टाका.. बरेच जण अखेरच्या टप्प्यात भरतात, जेव्हा वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असते. म्हणून आत्ता वेळ आहे तर भरून टाका, अडचणींचा सामना करावा लागणार नाही.