बऱ्याचदा एखादी गोष्ट आवडली की ती घेण्याचा मोह आवरत नाही. मग आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च होतो.. त्यात एखादी वस्तू EMI वर घेतली आणि काही EMI वेळेवर भरता आल्या नाहीत, तर आर्थिक ताण आणखी वाढतो. अशा परिस्थितीत जुन्या EMIची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घेणं हा अनेकांना सोपा मार्ग वाटतो. मात्र, हा मार्ग भविष्यात आर्थिक अडचणी वाढवणारा ठरू शकतो. उत्पन्नापेक्षा सातत्याने जास्त खर्च होत राहिल्यास कर्ज घेण्याची गरज निर्माण होऊ शकते आणि जेव्हा कर्जाचा भार आपल्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा वाढतो, तेव्हा कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढतो. म्हणूनच, जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घेण्यापूर्वी त्याचे भविष्यातील परिणाम समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कर्जाचं जाळं म्हणजे अशी परिस्थिती, ज्यामध्ये एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं आणि हळूहळू कर्जाचा भार वाढत जातो. हे एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा, या महिन्याची EMI भरण्यासाठी तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नाही. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता किंवा नवीन कर्ज घेता. त्यामुळे सध्याची EMI भरली जाते; मात्र, नवीन घेतलेल्या कर्जाची परतफेडही पुढील काळात करावी लागते. परिणामी, पुढील महिन्यांपासून तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात.
अशा प्रकारे एका कर्जातून दुसरं कर्ज आणि त्यातून पुन्हा नवीन कर्ज घेत राहिल्यास आर्थिक ताण वाढत जाऊ शकतो. RBIच्या आर्थिक साक्षरता मार्गदर्शनातही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार कर्ज घेत राहिल्यास कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका नमूद केला आहे.
कर्जाचं वाढतं ओझं तुमच्या संपूर्ण आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतं. दर महिन्याला जास्त EMI भरावी लागल्यामुळे दैनंदिन गरजांसाठी हातात कमी पैसे उरतात. त्यामुळे घरखर्च सांभाळताना अडचणी येऊ शकतात. याचा परिणाम बचत आणि गुंतवणुकीवरही होऊ शकतो. मुलांचं शिक्षण, आरोग्यावरील खर्च, कौटुंबिक गरजा किंवा भविष्यातील इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी पुरेशी तरतूद करणं कठीण होऊ शकतं.
कर्जाचा वाढता भार आणि EMIची वाढलेली जबाबदारी यामुळे परतफेड वेळेवर न होण्याचा धोका वाढू शकतो. EMI किंवा क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेवर न भरल्यास त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास भविष्यातील कर्जाच्या अर्जाचे मूल्यांकन करताना महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत किती EMI सहजपणे भरता येतील, याचा विचार करूनच कर्ज घेणं महत्त्वाचं आहे.
EMIची वेळेवर परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घेणं हा कायमस्वरूपी उपाय नाही.. काही परिस्थितींमध्ये कर्जाची पुनर्रचना किंवा इतर पर्याय उपलब्ध असू शकतात; मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावरील व्याज, शुल्क, एकूण परतफेड आणि आपल्या उत्पन्नाची क्षमता यांचा विचार करणं आवश्यक आहे..