New Scam: RTO चं ई-चलन समजून क्लिक करताय? आधी हे नक्की वाचा!

आजकाल दंड, बिल, KYC किंवा सरकारी नोटीसच्या नावाने मोबाईलवर मेसेज येणं सामान्य झालं आहे. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेत स्कॅमर्स नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आहेत. RTO च्या नावाने बनावट ई-चलन पाठवून मोबाईलमध्ये APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडण्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे.

याच पद्धतीने पुण्यात एका नागरिकाची तब्बल ₹3.04 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला RTOच्या नावाने बनावट दंडाचे चलन APK फाईलच्या स्वरूपात पाठवण्यात आले. ती फाईल उघडल्यानंतर आरोपींनी तांत्रिक पद्धतीने मोबाइलचा ताबा घेतल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर बँक खात्यातून ₹3.04 लाख ऑनलाइन वळवण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं तुमच्यासोबत घडू नये यासाठी आपल्याला याविषयी सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे.. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

नेमका हा RTO APK स्कॅम कसा होतो?

स्कॅमर्स आधी नागरिकाच्या मोबाईलवर RTO किंवा वाहतूक विभागाच्या नावाने मेसेज पाठवतात. उदा. तुमच्या वाहनावर दंड आकारण्यात आला आहे. चलन पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा. अशा मेसेजसोबत RTO Challan.apk, e-Challan.apk किंवा त्यासारखी APK फाईल अथवा संशयास्पद लिंक दिली जाऊ शकते. मेसेज अधिक विश्वासार्ह वाटावा यासाठी वाहन क्रमांक, दंडाची रक्कम किंवा सरकारी विभागाचा लोगो यासारख्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. अशा मेसेजमुळे नागरिक घाईघाईने फाईल उघडतात किंवा लिंकवर क्लिक करतात. एकदा लिंकवर क्लिक केल्यावर स्कॅमर्सचे काम सोपं होतं..

APK फाईल इतकी धोकादायक का?

APK म्हणजे अॅंड्राई़़ड अप्लिकेशन पॅकेज फाईल ( Android application package file). अनोळखी स्रोताकडून आलेली APK फाईल मोबाइलमध्ये इन्स्टाॅल केल्यास ती धोकादायक मालवेअर असू शकते. CERT-In ने मार्च 2026 मध्ये RTO/ई-चलान अॅंड्राई़़ड मालवेअर कॅम्पेन बाबत इशारा दिला होता. अशा मोहिमांमध्ये बनावट RTO किंवा ई-चलान सेजद्वारे नागरिकांना Malicious APK इन्स्टाॅल करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा मालवेअरमुळे संवेदनशील माहिती चोरीला जाणे आणि अनधिकृत आर्थिक व्यवहार होण्याचा धोका असतो. म्हणूनच WhatsApp, SMS किंवा अनोळखी वेबसाइटवरून आलेली APK फाईल कधीही इन्स्टाॅल करू नका.

खरं ई-चलान कसं तपासायचं?

तुमच्या वाहनावर खरंच दंड आहे की नाही, हे तपासण्यासाठी मेसेजमधील अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन माहिती तपासा. महाराष्ट्र मोटार वाहन विभागानेही नागरिकांना संशयास्पद ई-चलान/पेमेंट लिंक्सवर क्लिक करू नये आणि अविश्वसनीय स्रोतांमधून APK फाईल डाउनलोड किंवा इन्स्टाॅल करू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

लक्षात ठेवा..

  • अनोळखी नंबरवरून आलेला RTO मेसेज लगेच उघडू नका.
  • APK फाईल डाउनलोड किंवा इन्स्टाॅल करू नका.
  • संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  • OTP, UPI PIN, ATM PIN किंवा नेटबँकिंग पासवर्ड कोणालाही सांगू नका.
  • दंडाची माहिती अधिकृत ई-चलान/परिवहन पोर्टलवरच तपासा.
  • कोणत्याही वैयक्तिक UPI ID वर पैसे पाठवण्यापूर्वी त्याची खात्री करा.

मोबाइलमध्ये Install from unknown sources पर्याय अनावश्यकपणे सुरू ठेवू नका. CERT-Inनेही हा पर्याय बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

चुकून APK इन्स्टाॅल केली तर काय कराल?

जर तुम्ही चुकून संशयास्पद APK इन्स्टाॅल केली असेल, तर वेळ न घालवता मोबाइलचे Wi-Fi आणि मोबाइल डाटा बंद करा. संशयास्पद अप्लिकेशन अनइन्स्टाॅल करण्याचा प्रयत्न करा आणि trusted security/antivirus scan करा. तसेच सुरक्षित डिव्हाईस वापरून महत्त्वाचे पासवर्ड आणि UPI PIN बदलण्याचा विचार करा आणि मधील व्यवहार तात्काळ तपासा. CERT-Inनेही अशा परिस्थितीत नेटवर्क डिस्कनेक्ट करून संशयास्पद अॅप काढून टाकण्याची आणि आर्थिक खात्यांवर लक्ष ठेवण्याची शिफारस केली आहे.

फसवणूक झाली तर लगेच काय कराल?

जर तुमच्या खात्यातून पैसे अनधिकृतपणे वळवले गेले असतील, तर वेळ न घालवता 1930 या नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाईनला करा. तसेच नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा. सरकारी पोर्टलनुसार आर्थिक सायबर फसवणुकीसाठी 1930 ही तातडीची हेल्पलाइन उपलब्ध आहे.

कामाची गोष्ट

RTO, बँक, KYC, वीजबिल किंवा सरकारी विभागाच्या नावाने आलेला प्रत्येक मेसेज खरा असेलच असं नाही. मेसेजमधील लिंक किंवा फाईलवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती तपासणं हा सुरक्षित मार्ग आहे. एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यभराच्या कमाईवर परिणाम करू शकते. म्हणून घाई करू नका.. तपासा, खात्री करा आणि मगच पुढचं पाऊल उचला..